"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-भाग 2 - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"
मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.
----------------------------------------------------
पुनर्मूल्यमापन
कुठल्याही गोष्टीचे पुन्हा मूल्यमापन करताना सर्वात पायाभूत गरज असते ती प्रामाणिकपणाची. ज्या देशात एकाद्या व्यापार्याला "महाजन" म्हटले जाते, ज्याचे नागरिक धनाची आणि वैभवाची देवता असलेल्या लक्ष्मीची मनःपूर्वक आराधना करतात व ऐहिक सुखांना व अर्थार्जनाला आयुष्याचे मुख्य ध्येय मानतात त्या देशाच्या नागरिकांना अध्यात्माची आवड असलेले कां समजले जाते? आपण अध्यात्मिक कसे आणि ज्या अध्यात्मिकतेची आपण इतकी बढाई मारतो ती आपल्या आयुष्यात कुठली भूमिका पार पाडते? जात, संस्कृती आणि भाषा याबाबत इतकी विविधता असलेला आपला देश अद्याप एकसंध कसा राहिला? तो असा एकसंध राहिला ते भारतीयांचा 'आत्मा' एक असल्यामुळे कीं आपल्यातल्या ’सकल-भारतीयत्वा’च्या वाढत्या जाणीवा बळे-बळे जोपासलेल्या उच्चतेच्या जाणीवेमुळे नसून या उलट आपण खरेखुरे कसे आहोत याची पक्की जाणीव झाल्यामुळे आहेत?
वरील प्रश्नांची उत्तरे थंड डोक्याने देणे जरूरीचे आहे. हे प्रश्न टीकेचे मोहोळ उठविण्यासाठी किंवा कौतुकाचे शब्द ऐकण्यासाठी विचारलेले नाहींत. त्या प्रश्नाचे तसे मूल्य कांहींच नाहीं, ते केवळ आपले मूल्यमापन पुन्हा करण्यास भाग पाडण्यासाठी आहेत. या प्रश्नाची उत्तरे देता-देता या पुस्तकाचा दडलेला उद्देशही उलगडेल आणि तो उद्देश इथेच सारांशाने सांगणे हितावह होईल असे वाटते. भारतीय लोक सत्तेच्या समीकरणाबाबत अतीसंवेदनाशील असतात. सत्ता मिळविणे म्हणजे आयुष्याची एक कायदेशीर ध्येयपूर्ती आहे असे ते समजतात आणि सत्तेशी तडजोड करण्यात, तिच्याशी जुळवून घेण्यात आणि सत्तेचा केंद्रबिंदू शोधण्यात ते आपला धूर्तपणा वापरतात. ते सत्ताधार्यांबद्दल आदर बाळगतात आणि त्यांच्याबरोबर स्वार्थापोटी सहकार्य आणि संगनमत करायला उत्सुक असतात. सत्तेसाठी गटबाजी करायला किंवा कारस्थाने शिजवायला ते एका पायावर तयार असतात. सत्तेच्या मोहाचा व प्रलोभनाचा त्याग करतात त्यांचा ते आदर करतात. पण हा आदर त्यांच्या या वृत्तीचे अनुकरण करण्यासाठी नसतो तर केवळ त्यांच्या अशा मोहावर विजय मिळविणार्या वृत्तीच्या आदरापोटी!
वरिष्ठांसमोर नम्र पण कनिष्ठांबद्दल बेपर्वाई
अलीकडे झालेल्या बदलांची चर्चा आपण (या पुस्तकात) नंतर करू पण हे बदल जरी झाले असले तरी भारतीय लोकांचा कल अधिकारपदाच्या क्रमवारीला अतोनात मान देण्याकडे असतो. ज्यांना ते स्वतःपेक्षा वरिष्ठ समजतात त्यांच्यापुढे ते जरूरीपेक्षा जास्त झुकतात आणि ज्यांना आपल्यापेक्षा कनिष्ठ समजतात त्यांच्याशी ते बेपर्वाईने वागतात, त्यांना उपेक्षितात किंवा त्यांची हेटाळणी करतात. त्यामुळे स्वतःच्या सामाजिक स्थानानुरूप असणार्या स्वतःबद्दलच्या सन्मानाच्या कल्पना आणि स्वतःची वैयक्तिक प्रतिमा याचे भारतीयांच्या लेखी भरमसाट महत्व असते. त्यांची उपजत प्रवृत्तीनुसार आणि स्वभावतः त्यांचा कल लोकशाहीकडे नाहीं. इथे लोकशाही इतकी सहजासहजी रुजली याचे कारण या पद्धतीने झटपट मोठे होता येते आणि वैयक्तिक सत्ता, शक्ती आणि वैभव प्राप्त करून घेता येते याची त्यांना झालेली जाणीव!
भारतीय नागरिक इहलोकापलीकडचा विचार करणारे कधीच नव्हते किंवा कधीच असणारही नाहींत. त्यांना जगात उपलब्ध असलेल्या ऐहिक सुखसोयींचा प्रचंड सोस असतो आणि ते श्रीमंतांकडे आदराने पहातात. ते नफ्यामागे इतरांपेक्षा जास्त चिकाटीने लागतात. त्यामुळे ते धूर्त व्यापारी किंवा कल्पक आणि चतुर व्यवसायी बनू शकतात. त्यांची पावले खंबीरपणे जमीनीवर असतात आणि डोळे आपल्या जमाखर्चाच्या कीर्दवहीवर! (As in the case of temporal power) इहलोकाच्या 'कायद्या'नुसार भारतीय लोक अंतिम यशस्वी निकालाला महत्व देतात, तो मिळविण्यासाठी अनुसरलेल्या मार्गाला नाहीं. भारतीयांचा अध्यात्मिक कल जरी एक तत्वज्ञानाचा भाग म्हणून उदात्त असला तरी भारतीय लोक त्यांचा आपल्या धार्मिक चालीरीतींत केवळ सत्ता आणि वाईट मार्गाने वैभव मिळविण्यासाठी समावेश करतात. वाईट काळातून जाताना या तत्वज्ञानाचा उपयोग होतोच कारण त्यामुळे भारतीयांची चिकाटी वाढते. बहुतेक भारतीय इहलोकाच्या पलीकडीचा जो विचार करतात तो केवळ त्यांना स्वतःला ताबडतोब मिळाणार्या फायद्याशी संबंध नसलेल्या त्यांच्या भोवतालच्या सामाजिक वातावरणाबद्दलच्या औदासीन्याचा भाग असतो.
ईप्सित साध्य होत असेल तर भ्रष्टाचार बरोबर?
समाजातील असमता, गलिच्छपणा आणि मानवी हाल-अपेष्टां यांचा आश्चर्य वाटावे इतक्या सहजपणे स्वीकार करण्याच्या त्यांच्या वृत्तीचा पुरावा म्हणजे त्यांचा स्वतःत पूर्णपणे गुंतून जायचा स्वभाव! भारतीय लोक व्यवहारी असतात आणि त्यांचा दृष्टिकोन स्वाभाविकपणे अनैतिक असतो. हिंदु धर्मात पराकोटीच्या पापाची कुठलीही व्याख्या नाहीं. कुठल्याही कृतीचे ठराविक संदर्भात समर्थन करता येते आणि हिंदू लोक देवाला नित्यनेमाने 'लांच' देतात! भारतात भ्रष्टाचार बोकाळला आहे कारण आपले ईप्सित साध्य होत असेल तर भ्रष्टाचार ही चुकीची गोष्ट असे मानलेच जात नाहीं. भ्रष्टाचार पकडला गेला तर त्यावर जो नैतिक गदारोळ उठतो त्याची तीव्रता तो भ्रष्टाचार किती प्रमाणात स्वीकारण्याजोगा असतो त्याच्या विषम प्रमाणात असते. नैतिकतेची कल्पना आणि उच्च विचारसरणीचे तत्व भारतीयांना एक तात्विक पातळीवर आवडते पण रोजच्या आचरणात तत्व ते अव्यवहार्य म्हणून दुर्लक्षिले जाते.
मिरविण्यापुरती आधुनिकता?
नेहरूंच्या किंवा पाश्चात्यांच्या व्याख्येनुसर 'आधुनिकता' म्हणजे कुठल्याही विषयावर बुद्धीचा वापर करून पूर्वग्रहाशिवाय विचारपूर्वक प्रतिसाद देणे. अशी आधुनिकता हे सुशिक्षित भारतीयांचे लोकांत सांगायचे ध्येय आहे. कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय आणि वस्तुनिष्ठपणे असे म्हटता येईल कीं असे ध्येय अंगावर चढविलेली आधुनिकतेची झूल आहे व या झुलीच्या खाली भारतीयांवर सातत्याने असलेली रूढींची पकड लपविली जाते असे. भारतीयात आधुनिकता आणि रूढी ज्या पद्धतीने एकत्र नांदतात ती पद्धती खरोखर अनोखी आहे. शेवटी हिंदू हे हाडाचे अहींसावादी नसून ते व्यवहारीपणे हिंसेच्या मर्यादा समजून घेतात. जिवंत रहाण्याच्या अंतिम ध्येयासाठी ते हिंसा टाळायला तयार असतात. आपल्यापेक्षा प्रबळ असलेल्या शक्तीच्या विरुद्ध लढून आणि स्वतःचा आत्मघाती सर्वनाश करून घेण्यापेक्षा अंतर राखून एकत्र रहायला ते तयार असतात. त्यांची इतर धर्मांबाबतची ऐतिहासिक सहिष्णुता-खास करून लष्करी शक्तीचे पाठबळ असलेल्या धर्मांबाबतची-या संदर्भात समजण्यासारखी आहे. भारतातही जातीय दंगली होतात आणि जरी त्या ज्या पद्धतीने दाखविल्या जातात त्यांना 'प्रमाण' मानता येणार नाहीं. साधारणपणे ज्या हिंसेमुळे कांहीं प्रमाणात का होई ना अस्थिरता किंवा अराजक निर्माण होऊन समाज व्यवस्थेला भीती निर्माण होऊ शकते अशा हिंसेच्या भारतीय लोक विरुद्ध असतात. पण जातीय उच्च-नीचतेची किंवा शुद्धतेची अंमलबजावणी करण्याच्या नियंत्रित वातावरणात-ज्यात हिंसेला परंपरागत अनुज्ञा असेल किंवा जिथे आपल्या संख्येचे प्राबल्य असेल तिथे हिंदूही इतरांइतकेच हिंसक बनू शकतात!
कांहीं ठळक स्वभाववैशिष्ट्ये वर दिलेली आहेत पण ते त्यांचे संपूर्ण वर्णन नव्हे. प्रत्येक नियमाला अपवाद असतो. मनुष्यस्वभावात अगणित वेगवेगळ्या सूक्ष्म छटा असतात आणि स्वभाववैशिष्ट्यांत नेहमीच विशिष्ट तफावत असू शकते. भारतीय स्वभाववैशिष्ट्यांचे हे शब्दचित्र म्हणजे एक टीकात्मक समालोचनाचा प्रयत्नही नव्हे. हे शब्दचित्र आणि आपल्या स्वत:बद्दलच्या परंपरागत प्रतिमा यात नक्कीच फरक आहे. पण एकाद्या विशिष्ट नैतिक मापनदंडाने मोजल्यास कुठलीच राष्ट्रे 'चांगली किंवा वाईट', 'प्रबळ किंवा दुर्बळ' नसतात.
No comments:
Post a Comment